शबनम न्युज | मुंबई
राज्यात गेल्या काही दिवसांपासून घडत असलेल्या गुन्हेगारीच्या घटनांवरून ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्य सरकारवर घनाघाती टीका केली. तसेच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची देखील मागणी केली.
यावेळी बोलताना ठाकरे म्हणाले, पूर्वी गॅंगवॉर दोन गटांमध्ये व्हायचं, आता सरकारमध्ये गॅंगवॉर सुरू आहे. मुख्यमंत्री स्वतः गुंडाला पोसतायेत,अशी माहिती आहे. त्यांनी गुंडांना दूर करायला पाहिजे, महाराष्ट्रात सध्या जे काही चालले त्यावरून आपले भविष्य या गुंड्यांच्या हाती द्यायचं का? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला. तसेच राज्य सरकार बरखास्त करा आणि राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.
ते म्हणाले, मी मुख्यमंत्री असताना ज्यावेळी पोलिसांवर आरोप झाले. त्यावेळी मी खंबीरपणे महाराष्ट्र पोलिसांसोबत उभा राहिलो आहे. जेवढे लोक आमच्याबरोबर आहेत, त्यांच्यावर एक दबाव आहे. त्यांना धमक्या दिल्या जात आहेत आणि त्यातून ह्या हत्या होत आहेत, असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला. “भाजपने आओ, सब भूल जाओ” ही गुंडांसाठी मोदी गॅरंटी आहे, असा टोलाही यावेळी उद्धव ठाकरे यांनी लगावला.