राज्यासाठी आवश्यक ऑक्सिजन निर्मिती राज्यातच करण्यास प्राधान्य
शबनम न्युज / मुंबई
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासन करीत असलेल्या प्रयत्नांना श्री साईबाबा विश्वस्त संस्थानच्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प आणि आरटीपीसीआर प्रयोगशाळेमुळे बळकटी येणार आहे. श्री साईबाबांनी दिलेली मानवतेची आणि गोरगरीबांना अडचणीच्या काळात मदतीची शिकवण संस्थानने हा प्रकल्प उभारुन जपली असल्याचे कौतुकोद्गार मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी काढले. तसेच, सध्याच्या परिस्थितीत ऑक्सिजनसाठी इतरांवर अवलंबून राहणे परवडणारे नाही. त्यामुळे जास्तीत जास्त ठिकाणी ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प सुरु करणे आणि राज्याची असणारी दैनंदिन तीन हजार मेट्रीक टन ऑक्सिजन निर्मिती राज्यातच होईल, यासाठी प्राधान्य असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी संचलित श्री साईबाबा सामान्य रुग्णालय शिर्डी येथे मेडीकल ऑक्सिजन निर्मिती सयंत्राचे लोकार्पण आणि आरटीपीसीआर प्रयोगशाळा कार्यान्वयन चाचणी सोहळा आज दूरदृश्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री हसन मुश्रीफ, सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे, जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले यांच्यासह खासदार सदाशिव लोखंडे, आमदार राधाकृष्ण विखे पाटील, आमदार आशुतोष काळे, आमदार लहू कानडे, आमदार रोहित पवार, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्ग भोसले, श्री साईबाबा विश्वस्त संस्थान शिर्डीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे, शिर्डीचे नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे आदीसह रिलायन्स फौंडेशनचे पदाधिकारी आदी मान्यवर या कार्यक्रमात दूरदूश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, आपण कोरोनाच्या पहिल्या लाटेचा सामना केला. सध्या कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसते आहे. मात्र, तिसर्या लाटेची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे. अशावेळी आपण त्यासाठी आवश्यक आरोग्य सुविधांनी युक्त असले पाहिजे. पहिल्या लाटेनंतर आपण आरोग्य सेवा वाढविण्यास प्राधान्य दिले. दुसर्या लाटेची तीव्रता जास्त असल्याने आणि रुग्णांना ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात लागत असल्याचे दिसून आले.