शबनम न्यूज | पुणे
पुणे । प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्यात झिका व्हायरसचा पहिला रुग्ण हा पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात सापडला आहे. या व्हायरसला घाबरण्याची गरज नाही. राज्य सरकार याला वेळीच थोपवण्याचे काम करत आहे, असे राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आश्वस्त केले आहे. या व्हायरसचा रुग्ण राज्यात आढळल्याने या संदर्भात केंद्र सरकारची एक तीन सदस्यांची टिम राज्यात दाखल झाली आहे. राज्य जे काम करत आहे त्यावर सूचना देण्याचे काम ते करतील अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.
राज्यात झिका व्हायरसचा पहिला रुग्ण आढळल्याने राज्य सरकारने तात्काळ प्राथमिक खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. पाणी साठणारी ठिकाणे कोरडी करणे, धुम्रफवारणी करणे, डासांच्या अळ्या नष्ट करणे अशा अनेक गोष्टी केल्या जात आहेत. अंगदुखी, डोळे लाल होणे, अशी या व्हायरसची लक्षणे आहेत. मात्र झिका व्हायरसला घाबरुन जाण्याची गरज नाही. राज्यात व्हायरसचे संक्रमण झालेले नाही. यासाठी प्रतिबंधात्मक उपाय राज्य सरकार करत आहेत, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.