युवकांच्या मदतीने महापालिकेवर एकहाती सत्ता आणणार – माजी आमदार विलास लांडे
युवकांची मोठ बांधण्यासाठी प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी लांडे यांची घेतली भेट
पिंपरी (प्रतिनिधी) –
आगामी महापालिका निवडणूक सहा महिन्यावर आल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पक्ष बांधणीला वेग आला आहे. पक्षातील युवकांची मोट बांधण्यासाठी युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख यांनी नुकताच शहराचा दौरा केला. तत्पुर्वी, त्यांनी शहरातील राष्ट्रवादीचे खंबीर नेतृत्व मानले जाणारे भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांची भेट घेऊन मौलीक मार्गदर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी शहरातील युवक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन शहराच्या राजकीय घडामोडींचा अदांज घेतला. पिंपरी-चिंचवड महापालिकेवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आणण्यासाठी युवकांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे, युवकांना सोबत घेऊन महापालिकेवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आणण्याचा निर्धार माजी आमदार विलास लांडे यांनी केला आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक फेब्रुवारी 2022 मध्ये होणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे. प्रभाग एकचा की दोनचा यावर मतमतांतरे असली तरी प्रदेश पातळीवरील नेत्यांनी स्थानिक राजकारणात लक्ष घालायला सुरूवात केली आहे.
राष्ट्रवादीच्या प्रदेश नेतृत्वाकडून शहराच्या राजकारणाचा आढावा घेतला जात आहे. राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष मेहबुब शेख यांनी शहराच्या राजकीय परिस्थितीचा अंदाज घेण्यासाठी नुकताच दौरा केला. तत्पुर्वी, त्यांनी भोसरीतील राजमाता जिजाऊ महाविद्यालय येथे पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांची भेट घेतली.
शहराच्या राजकीय परिस्थितीवर त्यांच्यात बराचवेळ चर्चा झाली. पिंपरी-चिंचवड महापालिकेवर एकहाती सत्ता आणण्यासाठी महत्वाच्या मुद्यांवर लांडे यांनी शेख यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर शेख यांनी शहरातील यवक संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन शहरातील विविध भागाच्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला.
यापूर्वी ज्यांना पदं दिली आहेत, त्यांना कामाचे आदेश देणे, नवीन नियुक्त्या करणे, प्रभाग स्तरावर बुथ कमिट्या तयार करून नवीन कार्यकर्त्यांवर जबाबदारी देणे, आजपर्यंत केलेल्या कामाचा आढावा घेऊन झालेल्या चुका टाळून त्यातून पुढे जाण्यासाठी योग्य मार्ग काढणे. नागरिकांना भेडसावणारे प्रश्न, सत्ताधा-यांनी दिलेली फसवी आश्वासने, सत्ताधा-यांनी केलेल्या चुका नागरिकांच्या समोर मांडण्याचे काम होणे गरजेचे आहे. ते होताना दिसत नाही.
पक्षाची ध्येयधोरणे तळागाळातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोचविण्यासाठी टार्गेट घेऊन काम करणा-या युवकांची फळी तयार केली पाहिजे. त्यासाठी पक्षातील ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या सूचना विचारात घेतल्या पाहिजेत. तरच, आपल्याला येणा-या काळात महापालिकेवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आणता येईल, असे लांडे यांनी मेहबुब शेख यांना सूचविले.
——————————-
शेख यांचा झंझावाती दौरा
पिंपरी-चिंचवडमधील राजकीय परिस्थितीचा अंदाज घेण्यासाठी शेख यांनी शहराच्या विविध भागाला भेटी दिल्या. भोसरीतील गव्हाणे वस्ती, लांडेवाडी, इंद्रायणीनगर, निगडी, पिंपरी, संत तुकारामनगर, पिंपळे सौदागर, वाकड, चिंचवड, वाल्हेकरवाडी, निगडी प्राधिकरण आदी भागाचा त्यांनी दौरा केला. तेथील युवकच्या पदाधिका-यांना भेटून पक्षवाढीच्या सूचना त्यांनी दिल्या.