शबनम न्युज | पुणे
पुणे | प्रतिनिधी
रानडे इन्स्टिट्यूट मधील एम ए जर्नालिझम या अभ्यासक्रमाच्या स्थलांतराला पुणे श्रमिक पत्रकार संघ चा विरोध आहे. तसेच रानडे इन्स्टिट्यूटमधील एम.ए. जर्नालिझम हा अभ्यासक्रम स्थलांतर करण्याचा निर्णय रद्द करावा, असे मागणीचे निवेदन पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष मंगेश कोळपकर व सरचिटणीस सुजित तांबडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कुलगुरू डॉ.नितीन करमळकर यांना दिले आहे.
सदर निवेदनात त्यांनी नमूद केले आहे कि, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत रानडे इन्स्टिट्यूट मध्ये सुरू असलेल्या जर्नालिझम या पदवीत्तर पदवी वर्गाच्या अभ्यासक्रमात सुधारणा करण्याचा आपला विचार आहे. त्याबद्दल पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे सर्वप्रथम आपले हार्दिक अभिनंदन. या अभ्यासक्रमात सुधारणांची गरज आहे. या मताशी आम्ही सहमत आहो.त परंतु ते करण्यासाठी रानडे इन्स्टिट्यूट मधील एम. ए या वर्गाचे स्थलांतर करू नये, अशी पुणे श्रमिक पत्रकार संघाची विनंती आहे.
पुणे श्रमिक पत्रकार संघ आणि रानडे इन्स्टिट्यूट मधील पत्रकारितेचा अभ्यासक्रम याचा 1964 पासून निकटचा संपर्क आहे. या विभागातून पत्रकार म्हणून घडलेले अनेक विद्यार्थी देशातील प्रसारमाध्यमांत विविध पदांवर कार्यरत आहेत. तसेच अनेक ज्येष्ठ पत्रकारांनी हा विभाग घडण्यासाठी अतोनात कष्ट घेतले आहेत. त्यामुळेच रानडे इन्स्टिट्यूट चा लौकिक देशभर पसरला आहे. पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे विद्यापीठाच्या सहकार्याने या विभागात 1975 पासून डिप्लोमा चालविण्यात येतो. त्याची फी माफक असल्यामुळे ग्रामीण भागातील ही अनेक विद्यार्थी त्याचे शिक्षण घेतात. पुण्यातील पत्रकारांनी एकत्र येऊन विद्यापीठाच्या सहकार्याने एखादा अभ्यासक्रम सुमारे 35 वर्षांपासून अधिक काळ चालविण्याचा हा देशातील अभिनव आणि यशस्वी प्रयोग आहे. आगामी काळात हा प्रयोग आणखी यशस्वी होईल त्यासाठी संयुक्त प्रयत्नांची आवश्यकता आहे.
पत्रकारिता आणि समाज यांचा जवळचा संबंध आहे. त्यामुळे पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना ही असाइनमेंट करण्यासाठी वारंवार फिल्डवर जावे लागते. त्यासाठी रानडे इन्स्टिट्यूट हे विद्यार्थ्यांना अत्यंत सोयीचे ठिकाण आहे. डिप्लोमाचे अभ्यासक्रम याच इन्स्टिट्यूट मध्ये आणि पदव्युत्तर पदवी विभागाचा अभ्यासक्रम विद्यापीठातील कमुनिकेशन स्टडीज विभागात स्थलांतरित करण्याच्या विद्यापीठाच्या प्रस्तावाचा आपण फेरविचार करावा, असे वाटते. कारण, पदवीत्तर पदवी भागाच्या अभ्यासक्रमाच्या पायाभूत सुविधांचा आणि शिक्षकांचा डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांनाही फायदा होतो. परंतु एक अभ्यासक्रम विद्यापीठात आणि दुसरा अभ्यासक्रम संस्थेत. ही विसंगती होऊ शकते. तसेच सध्याच्या अभ्यासक्रमाची शैक्षणिक शुल्क विद्यार्थ्यांना परवडणारे आहे. कम्युनिकेशन स्टडीज मध्ये हा अभ्यासक्रम भविष्यात समाविष्ट झाल्यास त्याचे शुल्क ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना परवडणारे नसेल. या संस्थेतून पत्रकार घडतात. अनेक पत्रकारही येथे निष्ठेने विद्यार्थ्यांना शिकवतात. त्यामुळे आपल्या कारकिर्दीत लौकिक आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढेल असे उपक्रम सुरू करावेत.
रानडे इन्स्टिट्यूट ला हेरिटेज इमारतीचा आहे. पुणे विद्यापीठाचे मुख्य इमारतीच्या धर्तीवर या विभागातही आपल्याला सुधारणा करणे शक्य आहे. त्याचाही विचार व्हावा, रानडे इन्स्टिट्यूट मधील पदवीत्तर पदवी भागाचा अभ्यासक्रम विद्यापीठास स्थलांतरित करावा, अशी विद्यार्थी, कर्मचारी यापैकी कोणाचीही मागणी नाही. तरीही काही घटक विविध उद्देशाने या विभागाचे स्थलांतर करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याला पुणे श्रमिक पत्रकार संघ आणि पुणे पत्रकार प्रतिष्ठान यांचा तीव्र विरोध असेल. असे ही अध्यक्ष मंगेश कोळपकर व सरचिटणीस सुजित तांबडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.