शबनम न्युज | तळेगाव दाभाडे
तळेगाव दाभाडे | प्रतिनिधी
तळेगाव दाभाडे च्या नगराध्यक्षा चित्रा जगनाडे आणि सत्ताधारी भाजपचे नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचा गलथान आणि मनमानी कारभार चालू आहे. आर्थिक वाटा घाटात नागरिकांना वेठीस धरले जात आहे. सत्ताधाऱ्यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे तळेगाव शहराचा विकास खुंटला आहे. येत्या आठ दिवसात शहरातील प्रलंबित विकास कामांना सुरुवात करावी, अन्यथा पदांचे राजीनामे द्यावेत. या मागणीला सत्ताधारी भाजपने प्रतिसाद दिला नाही तर नाईलाजास्तव नगर परिषदेचे कामकाज बंद पाडण्यात येईल असा इशारा आमदार सुनील शेळके यांनी दिला.
तळेगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने घेतलेल्या पत्रकार परिषदेत शेळके बोलत होते. यावेळी मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बबनराव भेगडे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्ष गणेश खांडगे, तळेगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश काकडे, युवक अध्यक्ष आशिष खांडगे, माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी, नगरसेवक अरुण माने, नगरसेविका वैशाली दाभाडे, मंगल भेगडे, हेमलता हळदे, संगीता शेळके आदी उपस्थित होते.
आगामी निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर लढवली जावी नगर परिषदेत भाजपने गलथान मनमानी व भ्रष्टाचारी कारभार चालविला असल्याचा आरोप आमदार शेळके यांनी केला. नगर परिषदेची आगामी निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ या चिन्हावर लढवली जावी, अशी आग्रही भूमिका पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष व ज्येष्ठ नगरसेवक गणेश खांडगे यांनी मांडली. तळेगाव शहर सुधारणा व विकास समिती आणि जनसेवा विकास समिती अशा पर्यायाऐवजी पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढविली गेली तर निवडणुकीत मोठे यश मिळेल. असे मत त्यांनी व्यक्त केले.