कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विविध समन्वय समित्या
शबनम न्यूज : पुणे (दि.२९ डिसेंबर) :- पेरणे येथील ऐतिहासिक विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी समाज कल्याण विभागाने पुढाकार घेतला असून त्यासाठी विविध समित्यांच्या माध्यमातून नियोजन करण्यात येत आहे.
समाजकल्याण विभागाचे पुणे प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी हे प्रशासकीय समितीचे सदस्य सचिव असून त्यांनी शासनाच्या इतर विभागाच्या समन्वयक अधिकाऱ्यांशी समन्वय साधण्यासाठी विविध समित्यांचे गठण केले आहे. पुणे विभागातील समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त, जिल्हा समाज कल्याण अधिकारी आणि कर्मचारी अशा एकूण 71 जणांचा समितीमध्ये समावेश करण्यात आला आहे.
संनियंत्रण समिती, राजशिष्टाचार समिती पुणे, राजशिष्टाचार समिती कोरेगाव भिमा, नियंत्रण कक्ष पुणे, नियत्रण कक्ष कोरेगाव भिमा, 31 डिसेंबर रोजी रात्री होणाऱ्या कार्यक्रमासाठी नियोजन समिती, रंगमंच समिती, सुरक्षा पास समिती, प्रचार व प्रसिद्धी समिती आदी समित्याद्वारे नियोजन करण्यात येत आहे.
समितीतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना करावयाच्या कामकाजाबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी श्री.सोळंकी यांच्या उपस्थितीत ऑनलाईन बैठकीचे आयोजन करण्यात आले. अभिवादन कार्यक्रम नियोजनबद्धरितीने आणि उत्कृष्टरित्या संपन्न करावयाचा असून कोणतीही त्रूटी राहणार नाही तसेच कार्यक्रमाचे नियोजन करताना प्रत्येकाने कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्याच्या सूचनादेखील दिल्या.