- महिला बचत गटाच्या माध्यमातून राबवित आहेत महिला सक्षमीकरण अभियान
- पाच महिला बचत गटांची केली स्थापना
शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरातील थेरगाव परिसरातील सामाजिक कार्यकर्ते स्वर्गीय जावेद बाबा शेख यांच्यानंतर त्यांची पत्नी नगमा जावेद शेख यांनी समाजसेवेचा वारसा पुढे चालविण्यासाठी आपले पाऊल उचलले आहे. सामाजिक कार्यात आपल्या जीवनाची सुरुवात करताना त्यांनी प्रथमतः पाच महिला बचत गटांची स्थापना करून महिला सक्षमीकरणाला प्राथमिकता दिली आहे.
सामाजिक कार्यकर्ते जावेद बाबा शेख यांचे कोरोना काळात सामान्य नागरिकांची मदत करताना तसेच गरजू व्यक्तींना जीवनावश्यक वस्तूंची किट वाटप करताना नागरिकांच्या संपर्कात येऊन त्यांना कोरोना सारखा आजार झाला व या आजारातच त्यांनी आपले प्राण त्याग केले. त्यांच्यानंतर आता त्यांची पत्नी आपल्या पतीचा वारसा समाजसेवेची परंपरा पुढे चालविण्याचा प्रयत्न करीत आहेत. या प्रयत्नातून त्यांनी प्रथमतः सप्ततारा सोशल फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष सौ रुपाली रविंद्रकुमार भडाळे, सौ. सुवर्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनातून कल्सटर हेड ची जबाबदारी सांभाळत त्यांच्या निरीक्षणात पाच महिला बचत गटांची स्थापना केली. व या बचत गटाच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्याचा विडा उचलला आहे. या पाचही बचत गटांचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पुणे जिल्हा निरीक्षक सौ कविताताई आल्हाट यांच्या हस्ते करण्यात आले.
या महिला बचत गटांच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या योजना मार्फत अनेक महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच शासकीय योजनांची माहिती देऊन या योजनांचा लाभ गरजू महिलांना देण्यात येणार आहे.
या उद्घाटन प्रसंगी नगमा जावेद शेख यांनी महिलांना तसेच सामान्य नागरिकांना आवाहन केले आहे की, मी माझ्या पती स्वर्गीय जावेद बाबा शेख यांचे सारखेच सामाजिक कार्य करत राहणार असून, मला आपली साथ व आशीर्वाद हवे, मी आपला प्रभाग विकसित करण्याचाही प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असून सर्व महिला वर्गांचे सक्षमीकरण करण्याचा ही प्रयत्न करणार आहे. या कार्यक्रम प्रसंगी राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष वैशाली ताई काळभोर प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच असंख्य महिला नागरिक यावेळी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता इकाबाल शेख यांनी मोलाचे सहकार्य केले.