शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.०३ फेब्रुवारी) :- कचरा विलगीकरणाबाबत जनजागृती करण्यासाठी तसेच स्वच्छाग्रह मोहिमेसाठी नागरी सहभाग वाढवण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने “ स्वच्छता रथ” तयार करण्यात आला असून महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते या रथाचे उद्घाटन करण्यात आले. आपल्या शहराला देशातील प्रथम क्रमांकाचे स्वच्छ आणि सुंदर शहर बनवावे असे आवाहन महापौर माई ढोरे यांनी यावेळी केले.
चिंचवड येथील प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहाच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमास आयुक्त राजेश पाटील, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, उल्हास जगताप, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, पर्यावरण विभागाचे सहशहर अभियंता संजय कुलकर्णी, मुख्य अग्निशमन अधिकारी किरण गावडे, स्वच्छ भारत अभियान प्रकल्प अंमलबजावणी कक्षाचे उपआयुक्त संदिप खोत, कार्यकारी अभियंता रामनाथ टकले, राजेंद्र राणे, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, क्षेत्रीय अधिकारी राजेश आगळे, सिताराम बहुरे, मे.रामा व्हीजनचे गुरुदास भोंडवे आदी उपस्थित होते.
स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये पिंपरी चिंचवड शहराची देशस्तरावर २४ व्या क्रमांकावरून १९ व्या क्रमांकावर प्रगती झाली आहे. यंदा कचरामुक्त शहराचे सेवन स्टार मानांकन मिरवण्याकरिता महापालिकेने कंबर कसली आहे. स्वच्छ सर्वेक्षण २०२२ मध्ये या शहराला देशातील सर्वात स्वच्छ आणि सुंदर शहर बनविण्याचाही महापालिकेने संकल्प केला आहे. त्या दृष्टीने जनजागृती करून लोकसहभाग वाढवण्यासाठी विविध माध्यमांचा वापर करण्यात येत आहे. कचरा विलगीकरणाबाबत फेसबुक, ट्विटर,स्वच्छ मंच, व्हॉट्सॲप या समाजमाध्यमांद्वारे स्वच्छताविषयक विविध संदेश प्रसारित करण्यात येत आहेत. शहरात विविध ठिकाणी प्लॉगेथॉन मोहिमेचे आयोजन करून लोकसहभागातून कचरा गोळा करण्याचे उपक्रम राबवले जात आहेत. नदी स्वच्छता अभियान राबवून पर्यावरणविषयक जनजागृती आणि जाणीव निर्माण करण्यासाठी महापालिका प्रयत्न करीत आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी क्षमता बांधणी कार्यशाळा तसेच सोसायाटीधारक, औद्योगिक कंपन्या, हॉटेल, रेस्टॉरंट व्यावसायिक आदींच्या कार्यशाळा घेऊन कचरा वर्गीकरणाबाबत माहिती देण्यात आली.
स्वच्छतेची चळवळ व्यापक होण्यासाठी आता शहरात स्वच्छता रथाद्वारे प्रचार प्रसार करण्यात येत आहे. शहरातील विविध भागात हा रथ फिरणार आहे. एलईडी स्क्रीनवर विविध चित्रफिती दाखवून स्वच्छतेचे महत्व तसेच कचरा वर्गीकरणाबाबतची माहिती दाखवली जाणार आहे.