शबनम न्युज | मुंबई
कोविड पुन्हा डोके वर काढत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोविड बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्य शासन पुढील पंधरा दिवस लक्ष ठेवून असेल. निर्बंध नको असतील, तर नागरिकांनी स्वतःहून शिस्त पाळावी. मास्क वापरावा, लसीकरण करून घ्यावे, हात धुवावे आणि अंतर ठेवावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येथे केले.
मुख्यमंत्र्यांनी सायंकाळी कोविड टास्क फोर्स समितीच्या सदस्यांशी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. वर्षा निवासस्थानी असलेल्या समिती कक्षात झालेल्या या बैठकीस मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्री यांचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे, सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास, मुख्यमंत्री यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह आदी उपस्थित होते.
प्रारंभी अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी राज्यातील कोविड विषाणूच्या संसर्गाबाबत सविस्तर माहिती दिली.
१६ एप्रिल २०२२ रोजी राज्यात सर्वात कमी ६२६ सक्रिय रुग्ण होते. आज दीड महिन्यात त्यात सात पटीने वाढ झाली असून ती संख्या ४५०० वर गेली आहे असे सांगून आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले की, मुंबई, ठाणे, पुणे तसेच महानगर क्षेत्रात राज्याच्या एकूण रुग्ण संख्येच्या ९७ टक्के रुग्ण आहेत. मुंबईचा पॉझिटीव्हीटी दर ६ टक्के असून राज्याचादेखील वाढून ३ टक्के झाला आहे असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांत कोविड रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिलेल्या सूचनांनुसार कोविड आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शासन पुढील पंधरा दिवस परिस्थितीवर लक्ष ठेवून असेल. कोविडचा प्रसार वाढू नये यासाठी नागरिकांनी कोविड अनुकूल व्यवहार करण्यावर भर दिला पाहिजे.