राष्ट्रवादी महिला काँग्रेस स्पोर्ट्स सेलतर्फे खेळाडू, प्रशिक्षकांचा सन्मान
शबनम न्युज | पिंपरी
खेळामुळे शरीर, मन, बुद्धी आणि आत्मविश्वास याची चांगली जोपासना होते. अभ्यासाबरोबरच आणि कोणत्याही क्षेत्रात त्याचा फायदा होतो, त्यामुळे मुलामुलींच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांनी खेळाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन कबड्डीच्या माजी राष्ट्रीय खेळाडू तथा पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्ष कविता आल्हाट यांनी शनिवारी (दि. १८ जून) येथे केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वर्धापनदिन उपक्रमसप्ताह अंतर्गत महिला स्पोर्ट्स सेलतर्फे वाकड येथे शनिवारी (दि. १८ जून) आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या स्पोर्ट्स सेलच्या अध्यक्ष समिता गोरे, शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या उपाध्यक्ष विजया काटे, नगरसेवक मयूर कलाटे, चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या अध्यक्ष संगीता कोकणे, भोसरी विधानसभा मतदार संघाच्या अध्यक्ष पूनम वाघ, समता परिषदेच्या कार्याध्यक्ष कविता खराडे आणि पक्षाच्या स्पोर्ट्स सेलच्या अध्यक्ष समिता गोरे व्यासपीठावर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते शहरातील खेळाडू, प्रशिक्षकांना ‘प्राईड ऑफ सिटी स्पोर्टस् स्टार सन्मान २०२२’ देऊन गौरविण्यात आले.
दरम्यान, भारतातील खेळ जगताला नवा आयाम दिल्याबद्दल राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेबांचे सभागृहातील उपस्थितांनी उभे राहून टाळ्यांच्या गजरात अभिनंदन केले. पक्षाच्या माध्यमातून खेळाडूंना विविध योजनांचा लाभ घेता यावा म्हणून एनसीपी स्पोर्टस् सेलच्या वाकड कार्यालयातून मोफत सेवा आणि मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे समिता गोरे यांनी यावेळी सांगितले.
पारंपरिक खेळाचे प्रशिक्षण मलेशियात देण्यासाठी तसेच पुढील महिन्यात दुबईत होणा-या आंतरराष्ट्रीय पारंपरिक खेळाच्या स्पर्धेत देहू येथील मर्दानी खेळ असोसिएशनच्या प्रशिक्षकांच्या झालेल्या निवडीबद्दल असोसिएशनचे प्रमुख संजय बनसोडे यांचा सत्कार नगरसेवक मयुर कलाटे, कविता आल्हाट आणि समिता गोरे यांच्या हस्ते करण्यात आला. मर्दानी खेळातील गुणी मुलेमुली तसेच स्केटिंग मध्ये जागतिक विक्रमाची नोंद करणारे खेळाडू, त्यांचे प्रशिक्षक विनोद जगदाळे आणि राजे शिवछत्रपती स्पोर्ट क्लब, सस्ते स्पोर्टस् अकॅडमी, यूथ स्पोर्टस् असोसिएशन ऑफ इंडिया आदि संस्थांप्रमुखांना पाहुण्यांच्या हस्ते यावेळी ‘प्राईड ऑफ सिटी स्पोर्टस् स्टार सन्मान २०२२’ ने गौरविण्यात आले.
शहरातील प्रशिक्षक आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी पक्षाच्या माध्यमातून सहकार्य करण्याचे आश्वासन कविता आल्हाट यांनी दिले. लहान वयात जागतिक विक्रम करणा-या स्केटिंगच्या खेळाडूंचे कौतुक नगरसेवक मयुर कलाटे यांनी केले. यावेळी संगीता कोकणे, कविता खराडे आदींची भाषणे झाली. प्रास्ताविक आणि स्वागत समिता गोरे यांनी केले. सूत्रसंचालन अमीन खान यांनी केले. पिस्टल शूटिंगच्या राष्ट्रीय खेळाडू केतकी आणि कस्तुरी गोरे यांनी आभार मानले.