शबनम न्युज | मुंबई
आम्ही बंड केलेलं नाही तर उठाव केला आहे, असे वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी आज विधानसभेच्या दुसऱ्या दिवशीच्या अधिवेशनात केले. ते म्हणाले, मी १७ वर्षांचा असताना शिवसेनेत काम सुरु केलं. आम्हाला पुढे निवडणूक लढायला लागेल असं वाटलंही नव्हतं. मराठी माणसाच्या हक्कांसाठी आणि हिंदुत्वाचं रक्षण करणारी संघटना म्हणजे शिवसेना. बाळासाहेबांकडे पाहून आम्ही संघटनेत आलो. लोकांची सेवा करण्यासाठी सत्ता हे साधन समजून काम करावं लागेल असं बाळासाहेबांनी सांगितलं होतं. आमच्यावर अनेकांनी बंड केल्याची टीका होत आहे. आम्हाला जे मिळालं आहे बाळासाहेबांमुळे मिळालं आहे. आम्ही बंड केलेलं नाही तर उठाव केला आहे. माझ्यासारख्या टपरीवाल्यावर टीका केली गेली. धीरुभाई अंबानीही पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायचे, मुख्यमंत्री रिक्षा चालवायचे हा इतिहास आहे अशी आठवण गुलाबराव पाटील यांनी करुन दिली.
पुढे ते म्हणाले, आम्हाला मंत्री केलं हे उपकार आहेत. भास्कर जाधव यांनी चिंता कऱण्याची गरज नाही. आम्ही बाळासाहेबांची शिवसेना जिवंत ठेवणार आहोत. आम्हाला गटारीचं पाणी, प्रेतं अशा धमक्या देण्यात आल्या. आम्ही काही लेचेपेचे नाही. हातात जोर असणारा माणूस येतो आणि सत्तेत सामील होतो असा इशारा गुलाबराव पाटील यांनी दिला. शिवसेना संपत असेल तर ती वाचवण्याची जबाबदारी आमची आहे असंही ते म्हणाले.