शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड शहरातील अ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत येणाऱ्या उद्यानाची जागा ही आरक्षित असून सुद्धा या भूखंडावर अनधिकृतपणे मंगल कार्यालय करण्यात आले आहे. या आरक्षित भूखंड मध्ये उद्यान निर्माण करावे व अनधिकृत पणे या भूखंडावर असलेल्या मंगल कार्यालयावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते निखिल दळवी यांनी मनपा आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.
त्यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे कि, निगडी परिसरातील प्रभाग क्रमांक १४ आकुर्डी खंडोबा मंदिर शेजारी मनपा उद्यानासाठी आरक्षित असलेल्या भूखंड क्रमांक ८८ वर अनधिकृतपणे मंगल कार्यालय सुरू आहे. या मंगल कार्यालयावर कायदेशीर कारवाई व्हावी व हा भूखंड मनपा ने ताब्यात घेऊन उद्यानासाठी आरक्षित असलेल्या या भूखंडावर उद्यानाची निर्मिती करावी, या मागणी करिता वारंवार मनपा अधिकाऱ्यांशी तसेच सारथी हेल्पलाइनवर वेळोवेळी तक्रारी दिले आहेत. परंतु सदर तक्रारीची दखल मागील बऱ्याच दिवसापासून घेण्यात आली नाही तरी मनपा आयुक्तांनी सदर तक्रारीची दखल घेऊन या उद्यानासाठी राखीव असलेल्या भूखंडावर सुरू असलेल्या मंगल कार्यालयावर कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा जनआंदोलन करावे लागेल, असाही इशारा निखिल दळवी यांनी मनपा आयुक्तांना दिला आहे.