शबनम न्युज | ठाणे
देशाच्या 65 टक्के डेटा सेंटर हे नवी मुंबईत असून डेटा सेंटरचे हे मोठे हब आहे. मोठ्या प्रमाणात येथे गुंतवणूक येणार आहे. विमानतळ, इतर पायाभूत सुविधांमुळे नवी मुंबईत तिसरी मुंबई तयार होणार आहे. त्यामुळे नवी मुंबई आयुक्तालयाचे महत्त्व येत्या काळात आणखी वाढणार आहे. नवी मुंबई पोलिसांना वाढत्या आव्हानाचा सामना करण्यासाठी भविष्याच्या दृष्टीकोनातून अधिक सक्षम आणि अत्याधुनिक व्हावे लागणार आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत महिला सुरक्षा प्रकल्पाअंतर्गत नेरुळमधील सेक्टर 7 येथे उभारलेल्या महिला सहाय्यता कक्ष, सायबर पोलीस ठाणे तसेच महिला सुरक्षा प्रकल्पाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार मंदा म्हात्रे, आमदार सर्वश्री गणेश नाईक, रमेश पाटील, महेश बालदी, राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर, पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त किशन जावळे, सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, दिग्दर्शक रोहित शेट्टी, पोलीस सहआयुक्त संजय मोहिते, संजय पडवळ आदी उपस्थित होते.
यावेळी वाशी येथील सिडको प्रदर्शनी भवनात झालेल्या कार्यक्रमात निर्भया पथकासाठी दिलेल्या 10 चारचाकी व 40 दुचाकी वाहनाचे उपमुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून लोकार्पण करण्यात आले. नवी मुंबई पोलिसांसाठी दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी निर्मिती केलेल्या निर्भया पथकावरील लघुपटाचे अनावरण उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमासाठी सहकार्य केलेल्या संस्था व व्यक्तींचा उपमुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.