शबनम न्युज | सांगली
सांगलीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा घरासमोरच गोळ्या घालून निर्घृण खून करण्यात आला. नालसाब मुल्ला (वय 41, रा. गुलाब कॉलनी, सांगली) असे हत्या झालेल्याचे नाव आहे. शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली.
शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास मुल्ला याच्यावर बुलेट वरून आलेल्या दोघांनी गोळीबार केला. यात गंभीर जखमी झालेल्या मुल्लाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शंभर फुटी रस्त्यावरील माने चौकापासून जवळच मुल्ला राहण्यास होता. त्याचा बांधकाम साहित्य विक्रेचा बाबा सप्लायर्स या नावाने व्यवसाय आहे. समोरच्या बाजूस व्यवसाय तर पाठीमागे तो कुटुंबीयांसह राहत होता. शनिवारी रात्री तो घरासमोर थांबला असताना, दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्याच्यावर गोळीबार केला. या घटनेत त्याचा मृत्यू झाला. त्याच्या दिशेने आठ गोळ्या झाडण्यात आल्या. त्यातील चार ते पाच गोळ्या मुल्ला याच्या पोटावर व छातीवर लागल्या. त्याला तात्काळ उपचारासाठी शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले असताना उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव विश्रामबाग चे निरीक्षक संजय मोरे यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले. ही घटना कोणत्या कारणासाठी घडली हे अद्यापही स्पष्ट झाले नाही. तरीही यापूर्वीच्या गुन्ह्यातील वादातून ही घटना घडल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.