पुणे : भांडारकर रस्त्यावरील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी (मएसो) संचालित बाल शिक्षण मंदिर शाळेचा शताब्दी सांगता व स्मरणिका प्रकाशन सोहळा येत्या बुधवारी (दि. ३ जानेवारी २०२४) सायंकाळी ५.०० वाजता आबासाहेब गरवारे महाविद्यालयात आयोजित करण्यात आला आहे. मएसोचे अध्यक्ष, माजी विद्यार्थी, एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले यांच्या अध्यक्षतेखाली, माजी विद्यार्थिनी व उद्योगपती सुलज्जा फिरोदिया-मोटवानी आणि मएसोचे उपाध्यक्ष प्रदीप नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा होणार आहे. शाळेचे माजी विद्यार्थी व आंतरराष्ट्रीय पर्यावरण तज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचा विशेष सत्कार यावेळी करण्यात येणार आहे.
‘मएसो’ नियामक मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे, उपाध्यक्षा आनंदी पाटील, सचिव डॉ. अतुल कुलकर्णी, उपसचिव सुधीर भोसले, शाला समितीचे महामात्र डॉ. गोविंद कुलकर्णी, शाला समितीचे अध्यक्ष डॉ. विवेक कानडे, बाल शिक्षण मंदिर शाळेच्या मुख्याध्यापिका सुनिता चव्हाण, बाल शिक्षण मंदिर शाळेचे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. या समारंभाला उपस्थित राहून मएसो संस्था आणि बाल शिक्षण मंदिर शाळेचा आनंद द्विगुणित करावा, असे आवाहन शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता चव्हाण यांनी केले आहे.