शबनम न्यूज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
कोरोनाच्या उद्रेकानंतर जगभर अनेक देशात लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे अनेक ठिकाणी औद्योगिक मंदी आली. यानंतर जागतिक पातळीवर भारतीय उद्योग क्षेत्राला अनेक नविन संधी उपलब्ध होत आहेत. या संधीचे सोने करण्यासाठी उद्योग क्षेत्राला आपली उत्पादन क्षमता वाढवावी लागेल त्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज आहे. यासाठी भारतातील युवा पिढीला ‘बहु कौशल्य’ प्राप्त करावे लागेल. हे बहु कौशल्य पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या आकुर्डी आणि तळेगाव येथिल महाविद्यालयांमध्ये सुरु करण्यात आलेल्या ‘बी. व्होक’ चे कोर्सेस मधून विद्यार्थ्यांना मिळविता येईल असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनी केले.
आकुर्डी येथील पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका (पीसीएमसी) यांच्यामध्ये ‘बी. व्होक’ च्या कोर्सेसच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरेल असा सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी आयुक्त पाटील, पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई, आकुर्डी डी. वाय. पाटील ॲकेडमिक एज्युकेशन एक्सलन्स फेडरेशनचे कार्यकारी संचालक हुसेन हाजिते, करिअर मार्गदर्शक विवेक वेलणकर, यशस्वी ॲकेडमिचे संजय छत्रे, एनएमआयईटीचे प्राचार्य डॉ. ललितकुमार वाधवा, पीसीएमसी मोरवाडी आयटीआयचे प्राचार्य शशिकांत पाटील, गट निर्देशक प्राचार्य प्रकाश घोडके आदी उपस्थित होते.
यावेळी आयुक्त राजेश पाटील म्हणाले की, बारावी किंवा आयटीआय झाल्यानंतर प्रत्यक्ष कंपन्यांमध्ये कामाचा अनुभव घेत अभियंता होण्यासाठी ‘बी. व्होक’ चे कोर्सेस हि उत्तम संधी आहे. यातून तयार होणारे अभियंते ‘बहु कौशल्य’ प्राप्त करुन रोजगार मिळविण्यास सक्षम असतील. असे बी.व्होकचे कोर्सेस जिल्हा स्तरावर सुरु होणे आवश्यक आहे असेही आयुक्त राजेश पाटील म्हणाले.
याविषयी अधिक माहिती देताना डॉ. गिरीष देसाई यांनी सांगितले की, कोणत्याही शाखेतून बारावी उत्तीर्ण किंवा दोन वर्षांचा आयटीआय कोर्स झालेल्या विद्यार्थ्यांना आकुर्डीतील पीसीसीओई किंवा तळेगाव येथिल एनएमआयईटी तसेच एनसीईआर येथे बी. व्होक साठी प्रवेश घेता येईल. याच्या एकूण अकरा शाखा आहेत. प्रथम वर्ष पास होणा-या विद्यार्थ्यास डिप्लोमा प्रमाणपत्र, व्दितीय वर्ष पास होणा-या विद्यार्थ्यास अॅडव्हान्स डिप्लोमा प्रमाणपत्र आणि तीन वर्ष पास होणा-या विद्यार्थ्यास बी. व्होकचे पदवी प्रमाणपत्र मिळेल. या कोर्सेला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, एआयसीटी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल युनिव्हर्सिटीची मान्यता आहे. या महाविद्यालयात प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पीसीएमसी स्मार्ट सिटी कंपनीसह 140 हून जास्त कंपन्या आणि आस्थापनांबरोबर सामंजस्य करार करण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना 40 टक्के थेअरी आणि 60 टक्के ऑन जॉब ट्रेनिंग कंपनी कामाचा अनुभव मिळेल. तीन वर्षपुर्ण करुन पास होणारा विद्यार्थी पुढे उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेवू शकतो अशीही माहिती डॉ. गिरीष देसाई यांनी दिली. स्वागत डॉ. गिरीष देसाई, प्रास्ताविक प्रा. केतन देसले, सुत्रसंचालन आणि आभार प्रा. अश्विनी वझे यांनी मानले.