शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.१७ फेब्रुवारी) :- पिंपरी चिंचवड महापालिकेतील विविध कामांचे ठेके मिळवण्यासाठी कंत्राटदारांकडून देण्यात आलेली बँक गँरंटी बोगस निघाल्याचं प्रकरण भाजप नगरसेवक तुषार कामठे यांनी लावून धरलं होतं. तुषार कामठे यांनी पहिल्यांदा या प्रकरणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सभेत आवाज उठवला होता. या प्रकरणी काहीच न झाल्यानं तुषार कामठे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. अजित पवार यांची भेट घेतल्यानंतर संबंधित कंत्राटदारावर गुन्हा दाखल झाला. यामुळं पिंपरी चिंचवड मधील भाजप नगरसेवक तुषार कामठे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आभाराचे बॅनर्स लावले आहेत.पिंपळे निलख भागातील भाजप नगरसेवक तुषार कामठे यांनी शहरात विविध ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आभाराचे बॅनर्स लावल्याने शहरभर चर्चा सुरू झाल्या आहेत.
भाजपाच्या स्थानीक नेत्यांची मदत नाही, उलट त्रास देण्याचे काम
५ वर्षा मध्ये सातत्याने चुकीच्या कामां विरोधात लढत होतो व आपल्या करदात्यांच्या पैशाची होणारी लुट थांबवण्याचा प्रयत्न करत होतो, परंतु भाजपाच्या स्थानीक नेत्यांची कधीही मदत झाली नाही. उलट त्रास देण्याचे काम करत राहीले, परंतु जेव्हा नामदार अजितदादा पवार यांना भेटुन या विषयाची सविस्तर माहीती सांगितली, तेव्हा एका फोनवर महानगरपालिका आयुक्त व पोलीस आयुक्त यांना विषय गंभीर असल्याचे सांगितले व माहीती घेऊन गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले म्हणुन दादांचे आभार मानने माझे कर्तव्य आहे.असेही तुषार कामठे यांनी सांगितले आहे.