शबनम न्युज | वारजे
वारजे परिसरात एका ६५ वर्षीय महिलेचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला असल्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच घरातून रोख रक्कम आणि दागिने गायब असल्याचा आरोप कुटुंबांनी केला आहे. सुलोचना सुभाष डांगे (रा. वारजे) असे मृत महिलेचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास एकशेजारी इमारतीतील महिला पाण्याच्या पंपाशी संबंधित समस्या बद्दल सुलोचना यांच्याशी बोलण्यासाठी आल्या असता, त्यांना सुलोचना या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या. त्यानंतर त्यांनी त्यांच्या कुटुंबियांना माहिती दिली. सुलोचना डांगे या त्यांचा मुलगा आणि नातवासोबत राहत होत्या, पण घटना घडली तेव्हा त्या घरी एकट्याच होत्या.
पोलिसांनी सांगितले की, त्यांच्या मानेला आणि हाताला जखमा झाल्या असून त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा संशय आहे. त्यांच्या शरीराशेजारी एक वस्तरा सापडला ज्याचा वापर खुनाचे शस्त्र म्हणून केला गेला. तसेच प्रारंभिक तपासात दरोड्याचा हेतू असल्याचे दिसून आले. घरातून सुमारे ३६ हजारांची रोकड, सोन्याची चैन आणि सोन्याची झुमके गायब असल्याचे कुटुंबियांकडून सांगण्यात आले. याबाबत अधिक तपास वारजे पोलीस करीत आहेत.