शबनम न्युज :प्रतिनिधी
युरोकूल रुग्णालयात लॅप्रोस्कोपी तंत्रज्ञानाचा उपयोग; डॉ. ज्योत्स्ना व डॉ. संजय कुलकर्णी यांची माहिती
पुणे : ओपन सर्जरी किंवा कोणतीही चिरफाड न करता लॅप्रोस्कोपिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून दोन मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडल्याची माहिती युरोकूल-कुलकर्णी युरो सर्जरी इन्स्टिट्यूटचे (युरोकूल रुग्णालय) संस्थापक व जगप्रसिद्ध युरॉलॉजिस्ट डॉ. संजय कुलकर्णी व पहिल्या महिला लॅप्रोस्कोपिक तज्ज्ञ डॉ. ज्योत्स्ना कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत बुधवारी दिली.
दुर्बिणीच्या साहाय्याने मूत्रपिंड काढण्याची शस्त्रक्रिया कुलकर्णी दाम्पत्याने महाराष्ट्रात २००० मध्ये पहिल्यांदा केली होती. त्यानंतर आता युरोकूलमध्ये लॅप्रोस्कोपी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून ओपन सर्जरीविना मूत्रपिंड प्रत्यारोपण पहिल्यादांच झाल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी डॉक्टरांच्या टीमसह बाणेर-बालेवाडी मेडिकल असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजेश देशपांडे उपस्थित होते. मूत्रपिंड देणारे व घेणारे चौघेही रुग्ण गुगल मीटद्वारे पत्रकार परिषदेत सहभागी झाले.
डॉ. ज्योत्स्ना कुलकर्णी यांच्या नेतृत्वात डॉ. संजय कुलकर्णी, नेफरोलॉजिस्ट डॉ. सुहास मोंढे, डॉ. श्रुती डांगे, युरोसर्जन डॉ. पंकज जोशी, डॉ. श्रेयस भद्रनवार, डॉ. अमित होसमणी, डॉ. उदय चंदनखेडे, डॉ. आदर्श कुरी, डॉ. अपूर्व आनंद, डॉ. अमेय तळपल्लीकर, डॉ. मंजुश्री परदेशी, भुलतज्ञ डॉ. सुधीर फडके, नर्सिंग विभागाच्या सौम्या कुलकर्णी यांच्या टीमने या दोन्ही शस्त्रक्रिया यशस्वी केल्या.
डॉ. संजय कुलकर्णी म्हणाले, “डॉक्टर वडिलांचे मूत्रपिंड डॉक्टर मुलाला व नणंदेचे मूत्रपिंड भावजयीला असा भावनिक बंध जोडणाऱ्या या शस्त्रक्रिया आहेत. सध्याच्या युगात नातेसंबंध दृढ करणारी ही आदर्श व कुटुंबवत्सल घटना आहे. कोणत्याही रक्तस्रावाशिवाय झालेल्या या शस्त्रक्रियेनंतर या रुग्णांना उत्तमस्थितीत तिसऱ्या दिवशी घरी पाठवण्यात आले असून, चौघांचेही स्वास्थ्य उत्तम आहे. सततचे डायलिसिस टाळण्यासाठी मूत्रपिंड प्रत्यारोपण महत्वपूर्ण ठरते. ही शस्त्रक्रिया सहज झाल्याने रुग्णांना लवकर बरे होण्याचा विश्वास मिळाला आहे. “
मूत्रपिंड प्रत्यारोपण टीमचा सत्कार
युरोकूल रुग्णालयातील या दोन्ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर मूत्रपिंड देणारे-घेणारे वडील डॉ. पोपट साठे व डॉ. तुषार साठे, नणंद श्यामला कुलकर्णी व भावजय सुकन्या कुलकर्णी यांच्यासह सर्व डॉक्टर टीमचा सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ उद्योजक प्रतापराव पवार यांच्या हस्ते सर्वांचे कौतुक करण्यात आले. मूत्रपिंड दाता व शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
जागतिक मूत्रपिंड दिवसानिमित्त जागृती
मूत्रपिंडाच्या आजाराबाबत जागृतीसाठी मार्च महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी जागतिक मूत्रपिंड दिवस जगभर साजरा केला जातो. मूत्रपिंडे ही शरीरातील अत्यंत महत्त्वाचे अवयव आहेत. यांची योग्य ती काळजी न घेतल्यामुळे होणाऱ्या आजारांचे प्रमाण खूप वाढले आहे. समाजात याविषयी जागृती व्हावी, यासाठी युरोकूलमध्ये संपूर्ण महिनाभर मूत्रपिंड आजारांची विनामूल्य तपासणी व मार्गदर्शन केले जाणार आहे.
‘युरोकूल’ची सामाजिक बांधिलकी
‘युरोलॉजी’ व ‘नेफरोलॅाजी’साठी समर्पित बाणेर येथे १०५ बेडचे ‘युरोकुल’ भारतातील तिसरे मानांकित हॉस्पिटल आहे. मूत्रमार्गाच्या विकारांवरील अद्ययावत व सुसज्ज सेवा एकाच छताखाली २४ तास उपलब्ध आहेत. रुग्णांवर परवडणाऱ्या किंमतीत शस्त्रक्रिया, तसेच बिल भरण्यासाठी पैसे नाहीत म्हणून रुग्णाला परत पाठवले जात नाही, हे येथील वैशिष्ट्य आहे. या सामाजिक बांधिलकीमुळे देश-विदेशातील रुग्णांमध्ये ‘युरोकुल’ आपलेसे झाले आहे. जगातील सुमारे ५० देशांमध्ये जाऊन प्रात्यक्षिकांसह ‘युरेथ्रोप्लास्टी’ शस्त्रक्रिया करणारे डॉ. संजय कुलकर्णी आणि पहिल्या महिला लॅप्रोस्कोपिक तज्ज्ञ डॉ. ज्योत्स्ना कुलकर्णी हे ‘युरोकुल’चे प्रमुख आहेत. वयाच्या सत्तरीत कुलकर्णी दाम्पत्याने सुरु केलेल्या या रुग्णालयाला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले आहे.a