शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरातील मौजे पुनावळे प्रभाग क्र. 25 मधील रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी माजी नगर सदस्य शेखर ओव्हाळ यांनी पिंपरी चिंचवड मनपा, स्थापत्य विभाग कार्यालय कार्यकारी अभियंता यांना निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, मौजे पुनावळे प्रभाग क्र.25 मधील ओव्हाळ वस्ती येथील रस्ते, पुनावळे अंडरपास ते काटे वस्ती पर्यंतचा रस्ता कोयते वस्ती चौक ते माळवाडी पर्यंतचा रस्ता, पुनावळे येथील अंतर्गत रस्ते या सर्व रस्त्यांची फार वाईट अवस्था झालेली असून, जागोजागी रस्त्यांवर खड्डे निर्माण झालेले आहे. त्यामुळे नागरिकांना रस्त्याने वाहतूक करताना त्याचा खूपच त्रास सहन करावा लागत आहे. सदरच्या रस्त्यांचे डांबरीकरण पूर्णपणे उखडलेले असून रस्त्याचा सरफेस पूर्णपणे खराब झालेला आहे. त्यामुळे सदर रस्त्याने जाणाऱ्या मोठ्या वाहनांमुळे धूळ उडते व मागून येणाऱ्या दुचाकी वाहनांना त्या धुळीमुळे पुढचा रस्ता दिसून येत नाही. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच जगभरात पसरलेल्या कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षांमध्ये सदर रस्त्यांवर डांबरीकरणाची कामे करण्यात आलेली नाहीत. तरी या सर्व रस्त्यांचे डांबरीकरण केल्यास नागरिकांची अडचण दूर होणार आहे.
तरी या सर्व रस्त्यांची अवस्था लक्षात घेता, तसेच नागरिकांना वाहतुकीच्या सोयीच्या दृष्टीने सदर रस्त्याचे डांबरीकरण कामे लवकरात लवकर करण्यात यावे, असेही सदर निवेदनात शेखर ओव्हाळ यांनी नमूद केले आहे.